वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा; आ. हितेंद्र ठाकूर यांनी घेतली बिशप यांची भेट

वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा; आ. हितेंद्र ठाकूर यांनी घेतली बिशप यांची भेट

वसई : वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इटलीच्या व्हॅटीकन सिटीचे बिशप पोप यांनी ही नियुक्ती जाहीर केली. वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्हा हा वसई बिशप हाऊसच्या अखत्यारित येतो. वसई धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्याडो यांच्या निवृत्तीनंतर हे पद जून २०२४ नंतर रिक्त होते. २००९ पासून फेलिक्स मच्याडो हे बिशप पद सांभाळत होते. नवीन बिशपच्या नियुक्तीची प्रक्रिया मागील ५ महिन्यांपासून सुरू होती. यासाठी ३ नावांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शनिवारी दुपारी इटलीच्या व्हॅटीनक सिटी येथील बिशप पोप यांनी वसई धर्मप्रांतांच्या प्रमुखपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा (५२) यांची नियुक्ती जाहीर केली. फादर डिसोजा हे वसई धर्मप्रांताचे तिसरे बिशप असून सध्या ते नंदाखाल धर्मग्रामाचे (पॅरीश) प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत होते.

वसईच्या चुळणे गावचे मूळ रहिवासी असलेले फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा हे गेल्या अनेक वर्षांपासून धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे  संध्याकाळी साडेचार वाजता त्यांची वसईच्या बिशपपदी निवड झाल्याचे जाहीर झाले. ती घोषणा होताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी फादर डिसोजा यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बिशप यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ,माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, माजी सभागृह नेता फ्रँक डिओझा (आपटे),प्रकाश वनमाळी उपस्थित होते. तसेच यावेळी ठाकुरांनी बिशप डिसूझा यांच्या आईचीही भेट घेतली. यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, "वसईची संस्कृती ही नव्याने निवड झालेल्याचे अभिनंदन करण्याची आहे त्यातही वसईच्या धर्मगुरूंची निवड बिशप पदी होते हा वसईचा सन्मान आहे त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे  हा तमाम वसईकरांच्या अभिमानाचा क्षण आहे."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow