वसईत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये नाराजी - शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष नाराज

वसई - विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना वसईत मात्र महायुती मधील घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट ) नाराज असलयाचे समोर आले आहे. भाजपाकडून आम्हाला योग्य मान मिळत नाही, आम्हाला विचारात घेतले जात नाही अशी तक्रार दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या सभेला देखील दोन्ही पक्षाचे नेते गैरहजर होते. वसई विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून स्नेहा दुबे-पंडित या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. सध्या स्नेहा दुबे यांचा प्रचार सुरू असला तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना भाजपावर नाराज आहेत. भाजपा नेत्या स्मृती ईराणी यांची शुक्रवारी वसईत सभा झाली. या सभेला देखील दोन्ही पक्षांचे नेते गैरहजर होते. त्यामुळे महायुतीमध्ये असलेली नाराजी समोर आली आहे. ‘मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. मात्र मला कार्यक्रमाविषयी कळवलंच नव्हतं तर मी कसा जाऊ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला. तसेच आम्हाला योग्य तो मान दिला जात नाही, विचारात घेतले जात नाही असा आरोपही मुळीक यांनी केला आहे.
दुबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर १३ दिवस होऊन गेले मात्र आम्हाला काहीच विचारले जात नाही. तसेच स्मृती इराणी यांच्या सभेचे निमंत्रण सभा सुरु असताना दिले गेले त्यामुळे आपण सभेला उपस्थित नव्हतो असेही मुळीक म्हणाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र त्यांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे ते पुढे म्हणाले. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज असून त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचे भाजपा कडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. आमच्याकडून निश्चित काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे समन्वय राहून गेला. परंतु मी या नाराज नेत्यांची भेट घेऊन निश्चितपणे त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले. आम्ही सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?






