पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वसई-विरार महानगरपालिका सज्ज! यंदाही कृत्रिम तलावांची बांधणी करणा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वसई-विरार महानगरपालिका सज्ज! यंदाही कृत्रिम तलावांची बांधणी करणा

विरार:वसई-विरार शहर महानगरपालिकेने यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात २८ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यंदाही महापालिकेमार्फत कृत्रिम तलावांची निर्मिती, बंद दगडखाणी मध्ये विसर्जन, फिरते हौद, निर्माल्यांपासून खत निर्मिती केली जाणार आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये अव्वल ठरला होता, त्यामुळे यंदा अधिक व्यापक प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महापालिका उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी मागील वर्षी आयोजित केलेल्या यशस्वीपणे झालेल्या गणेशोत्सवाच्या आयोजनाची माहिती सादर केली. यंदा महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेली तयारी, नियोजन आदींविषयी माहिती दिली.

वसई-विरार शहर महापालिकेतर्फे मागील वर्षीप्रमाणे 'ईको गणेशा २०२४' ही संकल्पना राबविण्यात येत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, असे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले.

गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्था!

मागील वर्षी एकूण ३४ हजार ४७७ गणेशमूर्तीच्या विसर्जनापैकी २० हजार ८९६ गणेशमूर्तीचे विसर्जन महानगरपालिकेच्या कृत्रिम तलाव आणि फिरत्या हौदांमध्ये झाले. यंदाही एकूण १०५ कृत्रिम तलाव बनवण्यात येणार असून, आवश्यकता असल्यास पाहणी करून अधिक कृत्रिम तलावांची बांधणी करण्यात येईल. सर्व कृत्रिम तलावांशेजारी आरती करण्याची सोय करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावा शेजारी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार असून, जमा होणाऱ्या निर्माल्यातून बचत गटांच्या मार्फत खत निर्मिती केली जाणार आहे. विसर्जन स्थळी प्रथमोपचारासाठी वैद्यकीय पथकाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याशिवाय फिरते हौद, फिरते संकलन केंद्रांची सुविधा करण्यात येणार आहे. नागरिकांना आपल्या जवळच्या कृत्रिम तलावाचे ठिकाण गुगल लोकेशनद्वारे पाहण्यासाठी महानगरपालिकेमार्फत लिंक प्रसिद्ध केली जाणार आहे. चार फुटांच्या मोठ्या उंचीच्या मूर्तीचे विसर्जन बंद दगडखाणीत केले जाणार आहे. विसर्जनासाठी शहरातील दोन बंद दगडखाणींची आणि दोन जेट्टींची सोय करण्यात येणार आहे. गणपती आगमन आणि विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरु आहे.

एकखिडकी योजना आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर परवानगी मिळण्यासाठी यावर्षीही महानगरपालिकेमार्फत 'एक खिडकी योजना' सुरु असून गणेशमंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दिलेल्या नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरे करावे; तसेच त्यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम याबाबत त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षी महानगरपालिकेमार्फत 'पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये व मानचिन्हअसे असून याचबरोबर द्वितीय पारितोषिक १५ हजार, तृतीय पारितोषिक १० हजार आणि ०१ हजार रुपयांची १० प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील.

या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, माजी महापौर राजीव पाटील, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, बविआचे नेते विलास चोरघे, भाजपा वसई विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील, प्रहार संघटनेचे वसई तालुका अध्यक्ष दुष्यंत पाटील, मनसेचे नालासोपारा अध्यक्ष मनोहर कदम, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष वितेंद्र पाटील, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष विकास विचारे, वसई विरारचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रदीप मेस्त्री तसेच इतर पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow