मुंबई- युएई देशाचा बनावट व्हिसा तयार करून परदेशात प्रवास करणार्‍या एका इसमाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. त्याने ५ वर्षापूर्वी कॅनडा देशाचा बनावट व्हिसा तयार केला होता. तपासणी दरम्यान या व्हिसाकडे अधिकार्‍यांचे लक्ष गेले आणि त्यामुळे तो पकडला गेला. सारीफुल मंडल हा प्रवासी आबुधाबी येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. इमिग्रेशन अधिकारी गणेश गवळी (४२) त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याच्या पारपत्रामध्ये (पासपोर्ट) त्यांना कॅनडा देशाचा व्हिसा दिसला.

या व्हिसाचे बारकाईने निरीक्षक केले असता तो बनावट असल्याचा संशय आला. सारीफुल याला विंग प्रमुख अर्जुन बाबू यांच्याकडे हजर केले. अधिक चौकशीत हा व्हिसा बनावट असल्याचे आढळून आले. व्हिसावर कुठल्याची प्रकारचे सुरक्षेचे फिचर आणि हॉलोग्राम नव्हते तसेच व्हिसा स्टीकर ही कलर कॉपी होती. २०२० मध्ये त्याने उत्तराखंड येथील एका दलालाकडून कॅनडाचा बनावट व्हिसा बनवून घेतला होता. मात्र त्या एजंटने त्याला कॅनडात पाठवले नव्हते. त्यानंतर त्याने युएई देशाचा बनावट व्हिसा तयार केला. त्या आधारे मे २०२५ मध्ये तो कोलकात्याहून युएई या देशात गेला होता. युएई देशाचा व्हिसा बनावट असला तरी त्याचा कुणाला संशय आला नाही. मात्र तपासणीदरम्यान ५ वर्षापूर्वीच्या कॅनडा देशाचा बनावट व्हिसा आढळून आला आणि त्याचे बिंग फुटले. मंडल याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहार पोलिसांनी सारिफुल मंडल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ ९४) ३३६ (२), ३४० (२) आणि पारपत्र अधिनिय १९६७ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.