पालघर जिल्ह्यात वाहनांची नोंद झपाट्याने वाढली; वर्षभरात ९६ हजारांहून अधिक वाहने नोंदली

वसई : पालघर जिल्ह्यासह वसई-विरार परिसरात नागरिकांमध्ये नवीन वाहने खरेदी करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ९६,३०९ नवीन वाहने नोंदली गेली असून, गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या १२,००० वाहनांनी अधिक आहे.
जिल्ह्यातील झपाट्याने होत असलेले नागरीकरण, वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने वैयक्तिक वाहनांची गरज वाढत आहे. पूर्वी वाहन खरेदी मुख्यतः सणासुदीच्या काळात होत असे, मात्र सध्या दुचाकी वा चारचाकी वाहन ही नागरिकांची दैनंदिन गरज बनली आहे.
वाहतूक सुविधांमध्ये असलेली मर्यादा, अपुरी सार्वजनिक वाहतूक, आणि वाढत्या रहदारीमुळे नागरिक स्वतःचे वाहन वापरण्याकडे वळत आहेत. अनेक ठिकाणी लोकांना प्रवासासाठी पर्याय म्हणून ऑटोरिक्षा किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. यामुळेच जिल्ह्यात वाहन नोंदणीचा आकडा दरवर्षी वाढत आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाहन नोंदणीमध्ये दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहने आणि ऑटोरिक्षांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, ही वाढ फक्त नागरी भागापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागांपर्यंत पोहोचली आहे, जेथे आता ग्रामीण भागातील लोकही वैयक्तिक वाहनांची खरेदी करत आहेत.
What's Your Reaction?






