महाराष्ट्रात एनआयए व एटीएसची छापेमारी दहशतवादी कनेक्शन प्रकरणी तिघे ताब्यात

छ. संभाजीनगर : दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यात सहभाग प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे छापेमारी केली. यावेळी देश विरोधी कृत्यात सहभाग असलेल्या 3 जणांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्री एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. यात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना शहरात छापे टाकले. जालना येथील गांधीनगर येथून एकाला, छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौका जवळून एकजण आणि एन-6 परिसरातून एक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. त्यांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे. संबंधित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तीनही ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे संशयीत जम्मू-कश्मीरमधील जिहादी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.
What's Your Reaction?






