भाईंदर, २ जून:मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बस थांब्यांचे साहित्य चोरीला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत असून, त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय वाढली असून, सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आधुनिक व टिकाऊ असे एसटी बस थांबे उभारले होते. सध्या हरात परिसरात १५ पेक्षा अधिक बस थांबे कार्यरत आहेत. या थांब्यांमध्ये बसण्यासाठी बाके, पत्र्याच्या छपराची संरचना, सूचना फलक आदी साहित्य बसवले गेले होते.

मात्र सध्या या थांब्यांवरून बस थांब्यांचे साहित्य चोरीला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी बस थांबेच गायब झाले आहेत. विशेष म्हणजे, काही बस थांबे सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी तात्पुरते रस्त्याच्या कडेला हलवले गेले होते, मात्र काम पूर्ण होऊनही हे थांबे मूळ जागी परत बसवले गेले नाहीत. त्यातील काही थांबे आता संपूर्णपणे गायब असल्याचे समोर आले आहे.

या पूर्वीही हरात परिसरात नाल्यांवरील लोखंडी झाकणेपदपथांवरील लोखंडी जाळ्या चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. आता बस थांबे आणि त्यांचे साहित्यही चोरीला जात असल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर येत आहेत.

या प्रकरणाकडे महापालिकेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी महापालिकेच्या परिवहन विभागाने लवकरच सर्व बस थांब्यांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याचे आश्वासन दिले आहे.

या प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.