वसई, २ जून: विरारच्या अर्नाळा भागात वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा साधनांशिवाय वीज दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे समोर येत आहे.

शहरात नागरिकसंख्या वाढल्याने वीज मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त भार येत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्यात अडचणी निर्माण होत असून, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह खासगी कंत्राटी कामगारांचीही मदत घेतली जाते.

मात्र दुरुस्तीचे काम करताना आवश्यक ती सुरक्षा साधने न वापरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अर्नाळ्यात घडलेल्या अपघातात एक वीज कर्मचारी कामादरम्यान मृत्युमुखी पडल्याने महावितरणच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

"दुरुस्तीच्या वेळी कर्मचारी सुरक्षा साधने वापरत आहेत की नाही, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही नियमित तपासणी होत नाही," असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा साधनांची पूर्तता करण्याची आणि त्याचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, महावितरणच्या वसई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की,
"सर्व वीज दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, झुला, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट यासारखी सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात येतात. शिवाय, उपकरणांची योग्य हाताळणी, वीज खांबांवर चढताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात प्रशिक्षणही दिले जाते."

मात्र प्रत्यक्षात ही सुरक्षा यंत्रणा कितपत प्रभावी आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत ती पोहोचते का, याचा पुनर्विचार व तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.