मुल्लाबागमध्ये ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाविरोधात मूक आंदोलन

ठाणे – राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ठरलेल्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाविरोधात मुल्लाबाग परिसरातील नागरिकांनी आज मूक आंदोलनाचे आयोजन केले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुल्लाबाग परिसरातील सुमारे १२ हजार रहिवासी या भागात वास्तव्यास आहेत. येथील डोंगराळ परिसर, राष्ट्र्रीय उद्यानाची सान्निध्यता आणि घनदाट वृक्षराजी यामुळे येथे नेहमीच गारवा व निसर्गसंपन्न वातावरण आहे. या हिरवाईच्या आकर्षणामुळे अनेकांनी येथे घरं खरेदी केली आहेत. मात्र, भुयारी मार्गाच्या कामासाठी जुन्या आणि मौल्यवान वृक्षांची छाटणी व तोड सुरू करण्यात आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रहिवाशांनी सांगितले की, एमएमआरडीएने पूर्वी आयोजित बैठकीत आश्वासन दिले होते की पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, मात्र प्रत्यक्षात वृक्षतोडीला वेग देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी मुल्लाबाग येथील नागरिकांनी मूक आंदोलन करून आपला विरोध नोंदवला.
डॉ. तिका भानुशाली आणि नितीन सिंग या स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाला आमचा विरोध नाही, मात्र हा मार्ग पूर्णपणे भूमिगत असावा अशी आमची मागणी आहे. सध्या हा बोगदा मुल्लाबाग येथे संपतो आहे, ज्यामुळे परिसरातील वाहतूक व पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, छाटणी करण्यात आलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण स्थानिक गृहसंकुलाच्या आवारात करावे, आणि प्रस्तावित टोल नाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलवावा, अशीही रहिवाशांची मागणी आहे. मात्र एमएमआरडीएने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ठाण्यातील ‘ठाण्याती म्युज’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने आज सायंकाळी ४ वाजता मानपाडा चौकात आणखी एक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात ठाणे-बोरीवली भुयारी मार्गासह, घोडबंदर रस्ता रुंदीकरण आणि साकेत-आनंदनगर उड्डाणपुलासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधातही नागरिक आपला आवाज उठवणार आहेत.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विकासासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
What's Your Reaction?






