मुसळधार पावसामुळे पांढरतारा पूल पाण्याखाली, २५ पेक्षा अधिक वस्त्यांचा संपर्क तुटला

वसई, ७ जुलै : वसई-विरार परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई पूर्व भागातील तानसा नदीवरील पांढरतारा पूल पूर्णतः पाण्याखाली गेला असून, या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना आता १० ते १२ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
भाताणे, नवसई, आडणे, थल्याचा पाडा आणि इतर २० ते २५ पाडे व वस्त्यांतील नागरिकांसाठी हा पूल एकमेव दळणवळणाचा मार्ग होता. मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. यावर्षीही पावसाचे पाणी थेट पुलावरून वाहू लागले असून, या मोसमातील ही तिसरी वेळ आहे की पूल पूर्णतः जलमय झाला आहे.
तानसा नदीला आलेल्या पुरामुळे खानिवडे बांधारा सुद्धा पाण्याखाली गेला असून, नदीच्या काठावरील चांदीप, नवसई, शिवणसई, पारोळ, शिरवली, खानिवडे आणि कोपर या भागांतील शेतजमिनींमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांनी यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.
या भागातील नागरिकांचा जवळचा मार्ग बंद झाल्यामुळे, वज्रेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. वाहतुकीसाठी एकमेव असणारा हा पूल बंद झाल्याने शाळकरी मुलं, रुग्ण, वयोवृद्ध व कामावर जाणारे नागरीक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
स्थानिक प्रशासनाने तातडीने या भागात मदत व पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही आता जोर धरत आहे.
What's Your Reaction?






