प्रसिद्ध निर्मळ यात्रेला उत्साहात सुरुवात; ९ डिसेंबर पर्यंत चालणार यात्रा

प्रसिद्ध निर्मळ यात्रेला उत्साहात सुरुवात; ९ डिसेंबर पर्यंत चालणार यात्रा

वसई - सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या वसईतील श्री क्षेत्र निर्मळ येथील यात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला.  पुढील पंधरा दिवस ही यात्रा उत्साहात आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने सुरु राहणार आहे. या यात्रेला २७ नोव्हेंबरला सुरु झाली असून ती ९ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. श्री क्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् शंकराचार्य समाधी मंदिर आहे. बुधवारी पहाटे वाघोली येथून दिंडी काढण्यात आली. यावेळी लहान मुलांचा सहभाग होता तर बुधवारी रात्री पालखी मिरवणूक गावातून करण्यात आली तसेच महापूजा आणि अन्य उपक्रमांचे आयोजन केले आहे

निर्मळ क्षेत्राचे महत्व 

वसई तालुक्यातील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् शंकराचार्य समाधी मंदिर हजार दिड हजार वर्षापूर्वीपासून आहे. भगवान श्रीपरशुरामांनी विमलासुराचा वध करून श्रीविमल-निर्मळ सरोवर तीर्थाची निर्मिती केली आहे. या तीर्थाचे पावित्र्य काशी-प्रयागासारखे आहे. निर्मळ तीर्थक्षेत्री अनेक ऋषी, पांडव, जगद्गुरु आद्य शंकराचार्य, बुरुड राजा, देवप्रियदर्षी राजा, सातवाहन राजे, राजा भीमदेव, नाथाराव सिंधा भंडारी, ब्रह्मेंद्र स्वामी, श्रीमंत पेशवे यांचेही आगमन झाले होते. साडेतीनशे वर्षांपूर्वी श्रीमंत पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. तेव्हापासून या उत्सवाला सुरुवात झाली. भगवान परशुरामांची भूमी असलेल्या निर्मळच्या यात्रेला दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होत असते. 

नवी  मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील लाखो भाविक या यात्रेला येत असतात. १५ दिवस चालणार्‍या या यात्रेत लहान मुलांच्या खेळणींपासून वृद्धांच्या अंगरख्यापर्यंत आणि कंदी पेढेपासून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध असतात. तसेच बालकांसाठी असलेल्या गोल चक्रीपासून आकाश पाळण्यापर्यंत आणि जादूच्या प्रयोगापासून अनेक मनोरंजनात्मक खेळ याठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे या यात्रेला सायंकाळी चारपासून रात्री बारापर्यंत तुफान गर्दी असते. या यात्रेची तयारी अनेक दिवसापासून सुरू असून मंदिर परिसरात शेकडो लहान मोठी अशी दुकाने लागली असून यामुळे वसईत सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow