राज्यात महायुतीची सत्ता आल्यास, मुख्यमंत्री कोण ? शिवसेना आणि भाजपाचं ठरलं ?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून, आता निकालावर आधारित एक्झिट पोल समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे, आणि राज्यात सरकार स्थापनेसाठी महायुतीचे नेते वेगवेगळे दावे करत आहे. मात्र, महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरु असली तरीही शिंदे गटातील नेते एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे मत मांडताना दिसत आहेत तर दुसरीकडे भाजपाचे नेते शिंदेंच्या नावाला विरोध करत नसेल तरीही शिंदे किंवा इतर कोणताही महायुतीतील नेता मुख्यमंत्री झाला तरीही आनंदच होईल असे सांगताना दिसत आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, "आम्ही महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. राज्याच्या जनतेने त्यांचा चेहरा पसंती दर्शवला आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील."
तसेच, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत, परंतु निवडणुकीनंतर तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. शिंदे मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला आनंदच होईल."
आणि शिवसेना (शिंदे गट) चे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत स्पष्ट विचार मांडले. "आम्हाला विश्वास आहे की महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त सुस्पष्ट विजय मिळवेल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तीन प्रमुख पक्षांचे नेत्यांमध्ये होईल, पण शिवसेनेची भूमिका नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे," असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपद कुणाकडे जाईल याविषयी जरी असून सुस्पष्टता नसली तरीही, मुख्यमंत्रीपदाचा विषय राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेचा विषय झाला आहे.
What's Your Reaction?






