वसईत पतंग महोत्सवात रंगली राजकीय पतंगबाजी

विरार - राजकीय पक्षांच्या रंगातील पतंगे, मोफत पतंगाचे वाटप, डिजेवर लावण्यात आलेली गाणी, कार्यकर्त्यांच्या घोषणा असे चित्र वसईच्या सनसिटी येथे आयोजित पतंग महोत्सवात पाहायला मिळाले. त्यामुळे मैदानावर राजकीय पतंगबाजी रंगलेली होती. बहुजन विकास आघाडी आणि भाजपा कडून मंडप उभारण्यात आले होते. नागरिकांना आपल्या मंडपाकडे आकर्षित करण्यासाठी दोन्हीही पक्षांची स्पर्धा चालल्याचे यावेळी दिसून आले. बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांचे आमनेसामने आयोजन केले होते. दोन्हीही पक्षांनी
या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. त्याची झलक वसईच्या सनसिटी मैदानात पतंग महोत्सवाच्या निमित्ताने पहायला मिळाली. मंगळवारी सायंकाळी बहुजन विकास आघाडी व भाजपा अशा दोन्ही राजकीय पक्षांतर्फे पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या पतंग महोत्सवात पतंगबाजी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
विविध आकारांची-रंगांची पतंग, मोकळ्या आकाशात पतंग उंच उडविण्यासाठी लहानमुलांची चाललेली धावपळ आणि मुलांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी पतंग घेऊन उभे असलेले पालक असं चित्र मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वसई विरार परिसरात पाहायला मिळाले. यावेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. कुणी ढील दे रे ढील दे म्हणतंय तर कुणी फिरकीचा तोल सांभाळत पतंगाकडे पाहतंय, काही लहान मुले कापलेली पतंग गोळा करत आहेत तर मित्र मंडळींसोबत आलेल्या तरुण मुलांमध्ये पतंग कापण्याची स्पर्धा रंगल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
राजकीय पतंगबाजी
सनसिटी येथील एकाच मैदानात दोन्ही राजकीय आम्ही आमनेसामने आयोजन असल्याने मैदानात एक प्रकारे राजकीय खेचाखेची सुरू होती. दरवर्षी बहुजन विकास आघाडी आणि गुजराती नाट्य रसिक परिवारातर्फे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र भाजपने देखील मंडप उभारून आयोजन केले. दोन्ही पक्षांचे मंडप समोरासमोर होते. त्यामुळे मैदानावर राजकीय पतंगबाजी रंगलेली यावेळी पाहायला मिळाली. बहुजन विकास आघाडी आणि भाजपा कडून मंडप उभारण्यात आले होते. नागरिकांना आपल्या मंडपाकडे आकर्षित करण्यासाठी दोन्हीही पक्षांची स्पर्धा चालल्याचे यावेळी दिसून आले.
What's Your Reaction?






