वसई : प्रीपेड वीज मीटर निर्णयाविरोधात शिवसेना आंदोलन करणार; पंकज देशमुख यांचा इशारा

जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांचा वसई महावितरणला इशारा

वसई : प्रीपेड वीज मीटर निर्णयाविरोधात शिवसेना आंदोलन करणार; पंकज देशमुख यांचा इशारा

विरार - विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती; परंतु सरकार बदलताच महावितरणतर्फे आता नादुरुस्त मीटर बदलून तेथे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन जोडणीही स्मार्ट मीटरनेच दिली जात आहे. सरकारचा हा निर्णय सामान्य वीज ग्राहकांची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निर्णयाला तीव्र विरोध आहे. 

 या निर्णयाची अंमलबजावणी करण्याआधी महावितरणच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांत जनजागृती करण्यात येणे अपेक्षित आहे. प्रीपेड मीटरची उपयोगिता, त्याचे फायदे किंवा तोटे, संभाव्य अडचणी व उपाययोजना वीज ग्राहकांना कळणे गरजेचे आहे. तोपर्यंत सरकारने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा. अन्यथा; शिवसेनेच्या वतीने वसई महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिला आहे. 

या संदर्भात त्यांनी महावितरण-वसई सर्कलचे अधीक्षक अभियंता संजय खांदारे यांना शुक्रवार, 17 जानेवारी रोजी निवेदन दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कल्याण सर्कलमध्ये मोडत असलेल्या वसई-विरार शहरातील लाखो सामान्य वीज ग्राहक बाधित होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयाला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. राज्यभरातील ग्राहक संघटना, वीज कामगार आणि राजकीय पक्षांनीही या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे.

या निर्णयानुसार; 21 सप्टेंबर 2023 रोजी या कामासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. महावितरणच्या भांडुप, कल्याण व कोकण सर्कलमध्ये 63,44,066 मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी महावितरणने 7,594.45 इतका खर्च निर्धारित केला आहे. यासाठीची निविदा मेसर्स अदानी यांना देण्यात आलेली आहे. या खेरीज;    बारामती-पुणे सर्कलमध्ये 52,45,917 मीटर बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी 6,294.45, नाशिक व जळगाव सर्कलमध्ये 28,86,622 मीटरसाठी 3,461.06, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद सर्कलमधील 27,77,579 मीटरसाठी 3,330.53, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर सर्कलमधील 30,30,346 मीटरसाठी 3,635.53 आणि अकोला आणि अमरावतीतील 21,76,636 मीटरसाठी 2,607.61 खर्च निर्धारित करण्यात आलेला आहे. मेसर्स अदानीसह अनुक्रमे मेसर्स एनसीसी, मेसर्स माँटेकार्लो व मेसर्स जिनस यांना या कामाची निविदा वितरित करण्यात आलेली आहे. एकत्रित हे 27 हजार कोटींचे कंत्राट आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.

विशेष म्हणजे तत्कालिन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांकडे प्रीपेड वीज मीटर लागणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र या सरकारमध्ये मुख्यमंत्री होताच आता जबरीने त्यांनी हे वीज मीटर लावण्याचे काम सुरू केलेले आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर हा अन्याय आहे. त्यांची साफ फसवणूक आहे. सामान्य ग्राहक व शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर शिवसेना (उद्धब बाळासाहेब ठाकरे) कदापि सहन करणार नाही. आणि त्यासाठीच या निर्णयाबाबतीतील ग्राहकांचा संभ्रम दूर व्हावा; किंबहुना त्याबाबत जनजागृती व्हावी, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी. अन्यथा; शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महावितरण व त्याचे अधिकारी जबाबदार असतील, अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow