राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्तक महाविद्यालयाच्या 'दिवली' नृत्याला प्रथम क्रमांक

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्तक महाविद्यालयाच्या 'दिवली' नृत्याला प्रथम क्रमांक

विरार - नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयच्या 'दिवली' या लोकनृत्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.  यावेळी पारंपरिक लोकनृत्य स्पर्धत वर्तक महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिनिधित्व करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतून लोकनृत्याचे संघ सहभागी झाले होते. तसेच इतरही स्पर्धांमध्ये विध्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशीही संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. 

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाद्वारे  नवी दिल्ली येथे विकसित भारत अंतर्गत भारत मंडपम येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात 'दिवली' या पारंपरिक लोकनृत्याला प्रथम क्रमांक मिळाल्याने विद्यार्थिनींचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ममता बाली, शर्वरी सावे, कल्पिता कुरतडकर, योगिता विश्वकर्मा, प्राजक्ता गमरे, तेजस्वी थोरसे, त्रिशा सावंत, अर्पिता गमरे, पूर्वा सोनार आणि पार्वती दलाई या विद्यार्थिनींनी लोकनृत्य सादर केले. तर भूषण पाटील यांनी लोकनृत्याचे दिग्दर्शन केले. सहवादक म्हणून  प्रतीक पाटील, आदेश म्हात्रे यांनी काम पाहिले.

यावेळी आयोजित इतर स्पर्धांमध्येही विद्यार्थी सहभागी झाले होते. 'विकसित भारत @२०४७' या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अंश राय ह्या विद्यार्थ्याने सहभागी होत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यावेळी त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद मोदी, मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रा. विनायक निकस, प्रा. अलका मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सखाराम डाखोरे, सांस्कृतिक समितीचे  प्राध्यापक सदस्य,  दिलीप वर्तक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

वसई रेल्वे स्थानकावर केले जोरदार स्वागत 

विद्यावर्धिनी परिवारातर्फे दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी वसई रोड (प.) रेल्वेस्थानकावर लोकनृत्य संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली वसई रोड पश्चिम रेल्वे स्थानकापासून वर्तक महाविद्यालयाच्या प्रांगणापर्यंत काढलेल्या स्वागत रॅलीमध्ये अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनृत्याचे दिग्दर्शक भूषण पाटील तसेच त्यांचे सर्व वादक सहकारी आणि लोकनृत्य संघात सहभागी विद्यार्थिनींचे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पदके देऊन  स्वागत करण्यात आले. हा केवळ वर्तक महाविद्यालयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव असल्याचे यावेळी प्राचार्य डॉ. उबाळे यांनी आवर्जून सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow