वाढत्या वीज ग्राहकांच्या संख्येमुळे कार्यभार वाढत चालल्याने महावितरणने वसई पूर्व येथील उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून नवीन पेल्हार उपविभागीय व शाखा कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना अधिक जलद व दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वसई-विरार शहराच्या झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे वीज मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या वसई मंडळ अंतर्गत साडे दहा लाखांहून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यापैकी वसई पूर्व उपविभागातच २ लाख ५० हजारांहून अधिक ग्राहक आहेत. त्यामुळे तेथील कार्यालयावर मोठा कार्यभार असून सेवा देताना अडचणी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पेल्हार उपविभागीय कार्यालय तयार करण्यात येणार असून, त्यात जुचं, कोल्ही व वालीवचा काही भाग समाविष्ट असेल. नवीन उपविभागात सुमारे १ लाख ५७ हजार २६० ग्राहक आणि १४० मेगावॅट वीजपुरवठा समाविष्ट असेल. तसेच, वालीव शाखेचेही विभाजन करून नवीन पेल्हार शाखा निर्माण केली जाणार आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, या नव्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची भरती होणार आहे. पेल्हार उपविभागासाठी १२ पदे मंजूर असून त्यापैकी १० नवीन पदे भरली जाणार आहेत. यासाठी ₹१.०१ कोटी आणि शासकीय खर्चासाठी ₹५.२५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. शाखेसाठी १९ पदे असून, त्यात २ नवीन पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ₹२२.३२ लाख आणि शासकीय खर्चासाठी ₹१.७१ लाख इतक्या खर्चास मान्यता मिळाली आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले की, "या उपक्रमामुळे ग्राहकाभिमुख सेवा सुलभ होईल, कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल, नियोजन सुलभ होईल, वीज गळती कमी होईल आणि महसूल वाढीस मदत होईल."