मीरा भाईंदरमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन होणार; महापालिकेची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार

भाईंदर : येणाऱ्या पावसाळ्यात मीरा भाईंदर शहरात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि आवश्यक उपाययोजनांसंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
खाडीकिनारी वसलेले शहर असल्यामुळे, मीरा भाईंदरमध्ये अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्वतयारीला गती देण्यात येणार आहे.
बैठकीत आयुक्तांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरून काढावेत, तसेच नाल्यांची सफाई पूर्ण करताना तुटलेली झाकणे त्वरित बदलावीत. टेलिफोन, वीज व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या केबल्समुळे नाल्यांमध्ये अडथळा निर्माण होत असल्यास, त्या केबल्स त्वरित हलवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मोडकळीस आलेल्या व ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींच्या संरचनात्मक अहवालांची मागणी यापूर्वीच करण्यात आली असून, अशा धोकादायक इमारतींवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. सांभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दीपक खांबित, कार्यकारी अभियंते, भाग समिती क्रमांक १ ते ६ चे सहाय्यक आयुक्त आणि स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शहरात सध्या सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत तक्रारी वाढत असून, पावसाळ्यात हे काम रखडल्यास अपघातांची शक्यता वाढू शकते, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी सर्व कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत.
What's Your Reaction?






