वसई : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव उत्साहात संपन्न
यंदाच्या वार्षिकोत्सवासाठी ‘संगम: एक सांस्कृतिक विसावा’ अशी संकल्पना निवडण्यात आली होती. प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचे तसेच पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी ही संकल्पना निवडण्यात आली होती.

वसई : विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव 'संगम: एक सांस्कृतिक विसावा' उत्साहात साजरा झाला. सोमवार २३ आणि मंगळवार २४ डिसेंबर २०२४ रोजी सी. आर. राजाणी सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला. विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. पांडुरंग गजानन नाईक आणि कोषाध्यक्ष हसमुखभाई शहा यांच्या विशेष उपस्थितीत दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.
या सोहळ्यात गीतगायन, संगीत, नृत्य, साहित्य, आणि फॅशन शो यांसारख्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘संगम’ ही भारतीय व पाश्चात्य संस्कृतींचा सुंदर मिलाफ सादर करणारी संकल्पना होती. लावणी, कोळी, भरतनाट्यम, गरबा, रॅप, पॉप, आणि फ्यूजन नृत्य सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, आसाम, बंगाल, तामिळनाडू अशा विविध प्रांतांच्या लोककला व लोकसंगीताने प्रेक्षकांना भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचा अनुभव दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे हे 'स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२४' चे मानकरी ठरले त्याबद्दल उद्घाटन सत्रात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच ३५ वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या प्रमुख लिपिक सौ. सुधा वर्ठे आणि सी.एम. संखे, राजू भोईर आणि सुनील ठाकूर या येत्या वर्षात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने करण्यात आला.
या महोत्सवात सांस्कृतिक विभागाचे प्रा. पियुष राणा आणि प्रा. अमृता जाधव यांचे विशेष योगदान लाभले. विविध उपसमित्यांच्या सहकार्याने सांस्कृतिक विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, गायन, अभिनय आणि फॅशन शो यामधून आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम डोंगरे, प्रा. आदिती यादव, डॉ. विजयानंद बनसोडे, आणि प्रा. शैलेश औटी यांनी केले.
What's Your Reaction?






