वसई पूर्वेत भीषण पाणीटंचाई; संतप्त नागरिकांचा भाग समिती ‘जी’ कार्यालया हंडा मोर्चा

वसई:वसई पूर्व भागात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे बुधवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या भाग समिती ‘जी’च्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुर्या योजना, पेल्हार धरण, उसगाव प्रकल्प आणि एमएमआरडीए अंतर्गत अमृत योजना यांसारख्या विविध योजनांद्वारे दररोज ३७० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र, पालिकेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागांमध्ये अजूनही पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः भाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या कामण परिसरात ही समस्या अधिक तीव्र आहे.
शासनाकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली असली तरी त्या अद्याप कार्यान्वित झाल्या नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी अशा संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यावर्षी आंदोलनाचा मार्ग निवडला. आंदोलक नागरिकांनी सांगितले की आजही त्यांना नियमित पाणी मिळत नाही. पाण्यासाठी विहिरी, बोअरवेल, तलाव यांचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी खड्ड्यांत साचलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते, तर काही ठिकाणी लांब पल्यावरून पाणी आणावे लागते.
नवीन इमारती व विकास प्रकल्पांना नियमित पाणी दिले जात असले तरी वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना पाणी दिले जात नाही, अशी तक्रार आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पालिकेविरोधात निदर्शने केली. आंदोलनात शेकडो ग्रामीण महिला सहभागी झाल्या होत्या.
पाणीप्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
या चर्चेत पुढील उपाययोजना जाहीर करण्यात आल्या:
-
अमृत योजना-1 अंतर्गत वसई फाटा ते राजीवली दरम्यान ९०० मिमी व्यासाची पाण्याची मुख्य वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
-
ही वाहिनी पूर्ण होईपर्यंत २८ एप्रिल २०२५ पर्यंत स्टँडपोस्टद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा केला जाणार आहे.
-
कामण परिसरात २७ ठिकाणी बोअरवेल मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
टँकरद्वारे तातडीचा पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.
-
कामण येथे घुपाट बंधारे योजना आणि दलित वस्ती योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
याआधीही अशी आश्वासने देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यामुळे यावेळी जर पाणी दिले गेले नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलक नेत्या प्रीती म्हात्रे यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






