वसई- मालाडच्या मालवणी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३० वर्षाच्या इसमासोबत बालविवाह केल्याची घटना घडली आहे. या मुलीने रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली आहे. मालवणी पोलिसांनी मुलीशी लग्न करणारा, तसेच दोन्ही कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत 

पीडित मुलगी ही १४ वर्षांची आहे. मालाडच्या मालवणी येथे राहणार्‍या नसिमुद्दीन शेख (३०) याने तिच्याशी बळजबरीने लग्न केले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही  मुलीचे पालक, मुलाचे पालक तसेच लग्न लावणारा काजी यावेळी उपस्थित होते. लग्नानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. तिने एका खासही रुग्णालयात प्रसूती झाली. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याची बाब समोर आली.

रुग्णालयाने याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. मालवणी पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना गोरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पीडितेशी बेकायदेशीरपणे लग्न करून तिच्यावर बलात्कार करणारा नसीमुद्दीन शेख तसेच मुलीचे आणि मुलाचे पालक, लग्न लावणारा यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बलात्काराप्रकरणी  कलम ६४ (२) (आय) ६४(२) (एम) ६५(१) तसेच पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. 

मुलीच्या प्रसुतीनंतर ही घटना उजेडात आली आहे. आम्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैंद्र नगकर यांनी दिली.