विनाशकारी वाढवण प्रकल्पासाठी मच्छीमार उध्वस्त केला जाईल-संजय कोळी
विरार: पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमारांचे जीवन उदध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदराविरोधात शुक्रवारी पालघर जिल्ह्यासह विविध ठिकाणी निषेधाचा सूर उमटला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण येथे सदर बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सरकारला आपल्या भावना पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे ,धरणे, व प्रतिकात्मक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग, पालघर, डहाणू, वसई उत्तन, वर्सोवा इत्यादी ठिकाणी मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध करत उग्र आंदोलने केली. वसईत पाचुबंदर, किल्ला बंदर येथील मच्छीमारांनी वसई तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. माजी नगरसेवक संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सदरच्या आंदोलनात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या.
यावेळी आंदोलकांना मार्गदर्शनपर भाषणामध्ये कोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सदर प्रकल्पामुळे येथील जैवविविधता नष्ट करून पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या कुटुंबांना कायमचे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत या प्रकल्पासाठी पर्यावरणाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. अतिशय संवेदनशील असलेल्या तारापूर अणुशक्ती केंद्राची परवानगीही या प्रकल्पास घेण्यात आलेली नाही. सदर प्रकल्पासाठी पाच हजार एकरात माती भराव करण्यात येणार आहे. यापुढे जाऊन १७ हजार एकरावर हे बंदर उभे केले जाणार आहे. प्रकल्पासाठी दररोज हजारो बोटी या मार्गातून ये- जा करणार आहेत. येथील पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय हा उथळ पाण्यावरती अवलंबून असतो. १२० फुटांवर सुरू असलेली ही मासेमारी या प्रकल्पामुळे कायमची संपुष्टात येणार आहे. ३७ एकर जागा या प्रकल्पामुळे बाधित झाल्यानंतर मच्छिमार कायमचा उदध्वस्त होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर 'लाडकी बहीण'सारख्या योजना आणल्या जात आहेत. या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे आपण सरकारचे लाडके राहिलेलो नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या सरकारला धडा शिकवण्याचं काम मच्छीमारांनी करावे, या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी जाणीवपूर्वक दिवस तारीख अंधारात ठेवण्यात आली या कालावधीमध्ये मच्छीमार समुद्रात जात असतात. ही वेळ हेरून सदरचे भूमिपूजन घाई गडबडीने उरकण्याचा घाट घालण्यात आला.
परंतु, सरकारच्या दुर्दैवाने समुद्रात आलेल्या वादळामुळे सर्वच भागातील मच्छीमार मच्छीमारीसाठी गेलेले नाहीत. यामुळे आजच्या आंदोलनामध्ये आपल्याला सहभाग घेता आला. हा प्रकल्प अवघे २० ते २५ जण हाताळत आहेत. भांडवलदारांच्या सोयीसाठी हे सुरु असल्याचा आरोप करीत वेळ पडल्यास आपल्या प्रेतावरून या प्रकल्पाचे जेसीबी व डंपर नेण्याची तयारी ठेवावी लागेल. सरकारला जाग आणण्यासाठी या प्रकल्पाच्या जागेवर मच्छीमार बोटी बुडवून आम्हाला नष्ट करण्याची तयारी करावी लागेल. असे प्रतिपादन आंदोलन करताना मार्गदर्शनपर भाषणात करण्यात आले.
यावेळी वाळवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महामार्ग बंद ठेवण्याची पहिलीच घटना असल्याचे आंदोलनकर्त्यांतर्फे सांगण्यात आले. उपस्थितांची समायोजित भाषणे झाली. आम्ही वसईकर संघटनेचे मिलिंद खानोलकर, माजी विरोधी पक्ष नेते विनायक निकम, डॉमणिका डाबरे, कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदीया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा, आम आदमी पार्टीचे जॉन परेरा, एवरेस्ट डाबरे, निर्भय जनमंचचे पायस मच्याडो इत्यादी पदाधिकारी व आंदोलक उपस्थित होते. सदर प्रकल्पाला विरोध स्पष्ट करणारे निवेदन नायब तहसिलदार शशिकांत नाचण व निवासी नायाब तहसिलदार राजाराम देवकाते यांना यावेळी सादर करण्यात आले.
What's Your Reaction?






