वसई वसईकरांना दिलासा, पाणी योजनेतील बिघाड अखेर दुरूस्त ६ दिवसांनी वसईला पाणी मिळणार

वसई- वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएच्या सुर्या पाणी प्रकल्पातील योजनेतील बिघाड रविवारी संध्याकाळी दूर करण्यात यश आले आहे. कवडास येथील जलशुध्दीकरण प्रकल्पातील रोहित्र मंगळवारी नादुरूस्त झाल्याने मंगळवार पासून शहरात पाणी संकट निर्माण झाले होते. पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी ते काशीद कोपर मुख्य संतुलन टाकीपर्यंत आणण्यात मध्यरात्र होणार आहे. त्यानंतर सोमवारी नागरिकांना टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा केला जाणार आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेला सुर्या पाणी प्रकल्प योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी एमएमआरडीएच्या पाणी प्रकल्प योजनेतून १४० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्या नगर जलशुद्धीकरण केंद्रातील रोहित्रामध्ये मंगळवार २५ मार्च रोजी बिघाड झाला होता. त्यामुळे योजनेचा वीजपुरवठा पुर्णपणे खंडित झाला होता. यामुळे एमएमआरडीए योजनेचा पाणी पुरवाठा पूर्णपणे बंद झाला होता. मंगळवारपासून वसई विरार शहरात मोठे पाणी संकट निर्माण झाले होते. या काळात वसईकरांना केवळ सुर्या योजनेच्या जुन्या योजनेतून कमी दाबाने अनियमित पाणी पुरवठा करण्यात येत होता. हे रोहित्र दुरूस्त होत नसल्याने अखेर ते गुजराथ जिल्ह्याच्या वापी येथे पाठविण्यात आले होते.
रविवारी संध्याकाळी रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला आणि योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र योजनेतील पाणी काशीद कोपर मुख्य संतुलन टाकी (एमबीआर) येथे पोहोचण्यास आणखी ७ ते ८ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे योजनेतील पाणी महापालिका क्षेत्रास मध्यरात्री ३ ते ४ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर शहरात टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. बिघाड दूर झाला असून लवकरात लवकर नागरिकांना पाणी देण्यासाठी आमची यंत्रणा कार्यरत आहेत. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त (पाणी पुरवठा) समीर भूमकर यांनी केले आहे. अतिरिक्त रोहित्र उभारण्याच्या सूचना रविवारी नालासोपारा येथील आमदार राजन नाईक यांनी वापी येथे जाऊन सबंधित पाहणी केली आणि दुरूस्तीच्या कामाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी चर्चा करून रोहीत्र तातडीने दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. . गेले पाच दिवसांपासून सर्व नागरिकांना पाणीटंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याबद्दल त्यांनी नागरिकांची माफी मागितली आहे. पुन्हा अशी समस्या उद्भवू नये त्यासाठी खबरदारी म्हणून जलशुध्दीकरण प्रकल्पात एक अतिरिक्त रोहीत्राची व्यवस्था संबंधित विभागाने लवकरात लवकर उपलब्ध करुन ठेवावी या साठी देखील सूचना दिल्या आहेत.
What's Your Reaction?






