वसई : वसईत एका तरुणाने ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने सावत्र आईचा रागाच्या भरात खून केला. त्यानंतर वडील आणि काकाने गुन्हा लपवण्यास मदत केली. मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवण्यासाठी एका डॉक्टरने बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिले. क्राईम युनिट २ ने या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, महिलेला दफन केल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढून जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे.
पीडित महिला, अर्शिया खुसरो (वय ६१), या बॉम्बे उच्च न्यायालयात वकिली करत होत्या. इम्रान आमिर खुसरो (वय ३२) या सावत्र मुलाने त्यांचा खून केला. पोलिसांच्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी इम्रान अर्शियांच्या घरी गेला आणि ऑनलाइन गेमसाठी ₹१.८ लाख मागितले.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, इम्रानने संतापून अर्शियांचं डोकं स्वयंपाकघराच्या वॉशबेसिनजवळच्या भिंतीच्या कोपऱ्यावर आपटलं. त्या वेदनेने किंचाळल्या असता, इम्रानने त्यांच्या चेहऱ्यावर जोरात लाथ मारली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
या घटनेनंतर इम्रानने अर्शियांच्या बेडरूममधील कपाटातून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक चैन चोरी केली. वडील आमिर खुसरो यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी घरातील रक्ताचे डाग पुसून टाकले आणि त्यांच्या भावाला, सलीम खुसरो याला डॉक्टरकडे पाठवले. डॉ. आर. आर. गर्ग यांनी पैशांच्या मोबदल्यात अर्शियांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले, असा आरोप आहे.
क्राईम ब्रँचच्या युनिट २ ला या संशयास्पद मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. आमिर खुसरो यांनी अर्शिया घरात घसरून पडल्यामुळे मृत्यू पावल्याचे सांगितले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये २६ जुलै रोजी सकाळी १०.२२ वाजता इम्रान घरात जाताना दिसला. चौकशीत इम्रानने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
सोमवारी संध्याकाळी, पोलिसांनी अर्शियांचा मृतदेह वसईतील कोळीवाडा येथील मुस्लिम दफनभूमीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवला.
इम्रान खुसरो आणि आमिर खुसरो यांना अटक करण्यात आली असून, सलीम खुसरो आणि डॉ. आर. आर. गर्ग यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Previous
Article