विरार : वसई-विरार परिसरात अमली पदार्थ तस्करी वाढली असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱ्या परदेशी नागरिकांवर 26 सप्टेंबरपर्यंत कारवाई करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिला आहे. या संदर्भात तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी विनंती पत्र दिले आहे. वसई-विरार शहरात मागील काही वर्षांत परदेशी नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. हे परदेशी नागरिक अमली पदार्थ तस्करीत सक्रिय आहेत. या सगळ्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम समाजावर उमटत आहेत. वाढत्या अमली पदार्थ विक्री आणि सेवनामुळे युवापिढी व्यसनाधीन बनत असून; शाळा-कॉलेज आणि अन्य सामाजिक-धार्मिक केंद्र परिसरातही अमली पदार्थ विक्री आणि त्यांचे सेवन बिनदिक्कत होताना दिसत आहे.

या वाढत्या अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीवर; किंबहुना परदेशी नागरिकांच्या वास्तव्यावर आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या अमली पदार्थ विक्री आणि तस्करीवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरताना दिसत आहेत. परिणामी अमली पदार्थ विक्री व व्यसनाधिनतेला अधिकच जोर आलेला आहे.ही गंभीर व समाजविघातक बाब असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. समाजहित लक्षात घेऊन वसई-विरार शहरातील अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीवर आपण नियंत्रण मिळवावे, अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी पोलीस प्रशासनाकडून केली आहे. या कारवाईकरता 26 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा, आंदोलन करण्यावाचून शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पर्याय नसेल, असा इशाराही पंकज देशमुख यांनी या पत्रातून पोलीस प्रशासनाला दिला आहे.