विरार - पालघर जिल्ह्यातील विविध धरणातून वसई विरार महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे 330 एमएलडी पाणी वितरित केले जाते. मात्र योग्य नियोजनाच्या अभावामुळे यातील सुमारे 25 ते 30 टक्के पाणी म्हणजे सुमारे 90 ते 100 एमएलडी पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचा दावा महापालिका कडून केला जातो. मात्र पालिकेचा हा दावा खोटा असून पाणी गळतीचे प्रमाण अवघे पाच ते दहा टक्के इतकेच असून उर्वरित पाणी महापालिकेचे कर्मचारी महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता घेऊन रहिवासी सोसायट्यांना पुरवतात असा आरोप पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी केला आहे. 

महापालिकेकडून रहिवासी सोसायट्यांना देण्यात येणारी पाण्याची लाईन ही निव्वळ अर्धा इंच व्यासाची असते त्यामुळे यातून येणारे पाणी रहिवाशांना पुरत नाही.  त्यामुळे तूट भरून काढण्यासाठी त्यांना टँकरवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र कित्येक रहिवासी संस्थांना महिन्याचे लाखो रुपयांचे टँकरचे बिल भरणे हे डोकेदुखी ठरत आहे म्हणूनच महापालिकेच्या वॉचमनला महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता देऊन जास्तीचे पाणी सोडण्याचा पर्याय अनेक रहिवासी सोसायट्या स्विकारताना दिसत आहेत. 

यामुळे महापालिकेत भ्रष्टाचार वाढत असून याला आळा घालण्यासाठी महापालिकेने ठराविक रक्कम आकारून मोठ्या व्यासाची पाईपलाईन रहिवासी सोसायटी यांना द्यावी असे भट यांनी सांगितले आहे. या प्रश्नाबाबत याबाबत पालिकेच्या पाणी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी असे काही होत नसल्याचे सांगितले.