वसई-विरार मध्ये 'भाजपा' विजयी

विरार:विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाने बाजी मारलेली दिसून येत आहे. १३३ वसई मतदारसंघातून महायुती भाजपाच्या उमेदवार स्नेहा दुबे यांचा निसटता विजय झाला असून त्यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा अवघ्या ३,१५३ मतांनी पराभव केला आहे. अटी-तटीच्या लढतीत अखेर स्नेहा दुबे यांनी बाजी मारत विजय संपादन केला आहे. स्नेहा दुबे यांना ७७ हजार ५५३ तर हितेंद्र ठाकूरांना ७४ हजार ४०० मते मिळाली आहेत. तर नालासोपारा मतदारसंघात भाजपाचा विजय झाला असून भाजपाचे महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांचा ३६,८७५ मतांनी पराभव केला आहे.
राजन नाईक यांना १ लाख ६४ हजार २४२ मते मिळाली असून, क्षितिज ठाकूरांना १ लाख २८ हजार २३८ इतकी मते मिळाली आहेत. भाजपाने यावेळी वसई आणि नालासोपारा मतदारसंघात खूप मोठी ताकद पणाला लावली होती. प्रचारासाठी केंद्रीय पातळीवरील अनेक नेत्यांच्या सभा वसईत आणि नालासोपाऱ्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांना त्याचा फायदा झाल्याचे दिसुन येत आहे. वसई मतदारसंघात मुख्य लढत ही भाजपा (महायुती) , बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस ( महाविकास आघाडी ) यांच्यात होती तर नालासोपाऱ्यात मुख्य लढत ही बहुजन विकास आघाडी आणि भाजपा या पक्षांमध्ये होती. काँग्रेसने संदीप पांडे यांना आपली उमेदवारी दिली होती मात्र महाविकास आघाडीला या मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
What's Your Reaction?






