कांदळवन तोडीवर रामबाण उपाय : कांदळवनांना सीसीटीव्ही देखरेखीखाली आणणार

वसई : नवी मुंबई, भिवंडी, उरण, पनवेल, मिरा-भाईंदर व प्रामुख्याने वसई विरार शहरात होत असलेल्या कांदळवन तोडीबाबत शासन मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. पर्यावरणाला पुरक असणाऱ्या व स्थानिक शेतीचे उधाणाच्या लाटांपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घेतला असून कांदळवनांच्या तोडीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. त्यामुळे कांदळवन तोड करणे आता महागात पडणार आहे.
वसई पूर्वेत प्रामुख्याने जूचंद्र, बापाणे, ससुनवघर, मालजीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवनांची तोड झाली आहे. या कांदळवन तोडीत पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदळवनांची तोड करून त्यावर बेसुमार बेकायदेशीर माती भराव करण्यात येत असून अनधिकृत बांधकामांचे रान माजवण्याचे काम सुरू आहे. कांदळवन तोड, बेकायदेशीर माती भरावाप्रकरणी वालीव व नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असतानादेखील भूमाफिया मोठ्या प्रमाणात अनधिकृत माती भरावासाठी कांदळवनांची तोड करत आहेत. दरम्यान, महामार्गावर गेल्या काही वर्षात कांदळवनांची मोठ्या प्रमाणात तोड झाली असून पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे.
महामार्गावर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या ही महामार्गावरील अवैध कांदळवन तोड व अवैध माती भरावामुळे निर्माण झाली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसतानादेखील महामार्गावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तर महामार्गाची गतवर्षी प्रमाणेच अवस्था गंभीर बनली असती. याच धर्तीवर आता शासनाने कांदळवन तोड व अवैध माती भरावावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यामुळे कांदळवन तोड व अवैध माती भराव करणे आता महागात पडणार आहे.
What's Your Reaction?






