वसई-नालासोपारातील काँग्रेसच्या दावेदारीविरोधात शिवसैनिकांत नाराजी

वसई-नालासोपारातील काँग्रेसच्या दावेदारीविरोधात शिवसैनिकांत नाराजी

वसई : वसई व नालासोपारा या दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केल्याने वसई शिवसेनेत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व वसई विधानसभा संघटक विनायक निकम यांनी काँग्रेसच्या या दावेदारीविरोधात नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. 29 ऑक्टोबर रोजी ते आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.   

वसई व नालासोपारा हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पारंपरिक मतदारसंघ राहिलेले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेची प्रचंड मोठी संघटनात्मक बांधणी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वसईतून शिवसेना उमेदवाराला 76 हजारांचे मताधिक्क्य राहिलेले आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराने 1 लाख 6 हजारांचे विक्रमी मताधिक्क्य मिळवलेले होते. साहजिकच हे दोन्ही मतदारसंघ 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाट्याला येणे अपेक्षित होते. मात्र या दोन्ही मतदारसंघांवर महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने दावा केलेला आहे. वसईत पूर्वाश्रमीचे शिवसेना उमेदवार विजय पाटील यांनाच काँग्रेसने आपल्याकडून उमेदवारी दिलेली आहे. 

तर नालासोपारा मतदारसंघात अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी; आज ही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जागेसाठीदेखील काँग्रेस आग्रही असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात पालघरमध्येही काँग्रेसनेच मनोहर दांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्याने पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. याच नाराजीचा भाग म्हणून शिवसेनेचे वसई विधानसभा संघटक विनायक निकम बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वसई विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow