वसई : ‘आरोग्यवर्धिनीं` व ‘आपला दवाखाना`च्या देखभालीसाठी पालिकेकडून दोन अभियंत्यांची नियुक्ती

विरार - वसई-विरार महापालिका क्षेत्रातील २६ आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या 15 ‘आपला दवाखाना` यांची डागडुजी व देखभाल करण्यासाठी दोघा अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार; कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी व प्रभाग समिती ‘ब`चे ठेका कनिष्ठ अभियंता संतोष वामन संख्ये यांना त्यांच्या नियमित पदाचे कामकाज सांभाळून ‘आयुष्यमान आरोग्यवर्धिनी` व ‘आपला दवाखाना`चे कामकाज करण्याचे आदेश आयुक्तांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी शुक्रवार १६ जानेवारी रोजी दिले आहेत.
१५ व्या वित्त आयोगानुसार; वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्राकरता एकूण ६५ आयुष्मान आरोग्यवर्धिंनी केंद्र व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे १५ आपला दवाखाना केंद्र मंजूर करण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत २६ आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र व १५ आपला दवाखाना स्थापन करण्यात आलेले आहेत. आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याकरता शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र सदरचे अनुदान वेळेत खर्च न केल्यास शासनाकडे पुनश्च वर्ग होते.
यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रांकरता आवश्यक जागा शोधणे, विविध बांधकामसहित असलेल्या जागांची दुरुस्ती व नवीनीकरण करणे, कंटेनर स्थापित करणे, प्लिंथचे कामकाज करणे तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या २६ आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र व १५ आपला दवाखाना यांची डागडुजी व देखभाल करण्याबाबतच्या कामकाजासाठी या अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी आदेशात म्हटले आहे.
What's Your Reaction?






