वसई-विरारमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित – महावितरणची वीज यंत्रणा स्मार्ट कधी होणार

वसई-विरार: मागील काही वर्षांपासून वसई-विरार परिसराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक वादळात महावितरणची वीज वाहिन्या कोसळतात, ज्यामुळे संपूर्ण भागातील वीजपुरवठा तासन्तास खंडित राहतो. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, तर दुसरीकडे महावितरणला आर्थिक नुकसानही सोसावे लागते.
वादळांमुळे वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत महावितरणकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कोणताही शाश्वत आराखडा तयार न करता केवळ तात्पुरते डागडुजीचे उपाय योजले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. परिणामी "महावितरणची वीज व्यवस्था स्मार्ट कधी होणार?" असा सवाल आता जनतेतून उघडपणे विचारला जात आहे.
वसई-विरारसह वाडा आणि आजूबाजूच्या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीजेची मागणीदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि टिकाऊ वीज वितरण प्रणालीची गरज आता अधिक भासत आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरणने वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन, स्मार्ट व सुरक्षित वीज वाहिन्यांचे जाळे निर्माण करणे अत्यंत आवश्यक ठरते. अन्यथा, दरवर्षी वादळी वाऱ्यांमध्ये वीज पुरवठा खंडित होणे, नागरिकांचा संताप आणि आर्थिक नुकसान हे चक्र कायम सुरूच राहणार आहे.
What's Your Reaction?






