विरार:तब्बल 12 वर्षांनी अखेर वसई-विरार महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाने वसई-विरार शहरातील वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. पालिकेने यासाठी तब्बल 3 कोटी रुपये इतकी तरतूद केली असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

या आधी मुंबईस्थित टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून 2013 ते 2016 या कालावधीतील वसई-विरार महापालिकेच्या नऊही प्रभागांतील वृक्षगणना करण्यात आलेली होती. त्यानंतर 2016-17 साली शहरातील वृक्षगणनेचा अहवाल वसई-विरार महापालिकेचे तत्कालिन आयुक्त सतीश लोखंडे यांना प्राप्त झाला होता. वसई-विरार महापालिकेचे क्षेत्र हे 298.08 चौरसकिलोमीटर परिसरात विस्तारलेले आहे. या पाहणीत शहर परिसरात 261 प्रजातींच्या तब्बल 14 लाख 14 हजार 462 इतक्या वृक्षांची नोंद झालेली होती. या 261 प्रजाती 59 कुटुंबांतील असल्याचे अभ्यासाअंती पुढे आले होते. ही पाहणी टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. यांनी जीओ टॅगिंग व जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली होती. या प्रत्येक झाडाचे स्थानिक नाव, उंची, वय आणि त्यांची सदृढता अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेले होते.

विशेष म्हणजे; यातील 3 लाख 95 हजार 836 इतके वृक्ष केवळ सुपारीचे होते. पाहणी करण्यात आलेल्या एकूण वृक्षांपैकी 71 टक्के वृक्ष हे तारुण्यावस्थेत होते. तर 13 लाख 72 हजार 663 वृक्षांची नोंद सदृढ अशी करण्यात आलेली होती. 251 प्रजातींपैकी 140 प्रजाती या स्थानिक प्रजातीच्या आढळून आलेल्या होत्या. यात स्थानिक प्रजातीचे 78 टक्के वृक्ष म्हणजेच त्यांची संख्या 11 लाख 5 हजार 543 इतकी होती. मुख्य म्हणजे; पाहणीतील अधिकाधिक वृक्ष हे खासगी मालकीचे होते. त्यांची संख्या 11 लाख 31 हजार 598 इतकी होती. यात प्रभाग ‘अ` (13,745.6 किलोमीटर) हा सर्वाधिक वृक्षसंख्या असलेला प्रभाग होता. तर प्रभाग ‘जी`मध्ये (1195.76 किलोमीटर) सर्वाधिक कमी वृक्षसंख्या दिसून आलेली होती.