वसई-विरार महापालिकेकडून पाण्यात बुडालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी अत्याधुनिक सोनार स्कॅनर खरेदी

वसई, १४ जून: वसई-विरार परिसरात पावसाळ्यात दरवर्षी पाण्यात बुडण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ७ अत्याधुनिक ‘सोनार स्कॅनर सर्च कॅमेरे’ खरेदी करून अग्निशमन दलाला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले आहे. या उपकरणांच्या मदतीने आता पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचा शोध अधिक प्रभावी आणि जलद गतीने घेता येणार आहे.
पावसाळ्यात तलाव, खदाणी, नद्या आणि इतर जलस्रोत तुडुंब भरत असल्याने अनेक युवक व मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरतात. मात्र अनेकदा पाण्याची खोली किंवा परिसराचा अंदाज न आल्याने बुडण्याच्या घटना घडतात. यामुळे शोध मोहीमेसाठी अग्निशमन विभागाला वेळेवर माहिती मिळत नाही, आणि बुडालेल्या व्यक्तीच्या शोधात विलंब होतो.
सोनार स्कॅनर कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये:
-
हे उपकरण ५० मीटर खोल पाण्यापर्यंत स्कॅनिंग करू शकते.
-
स्कॅनिंग रेंज – शॉर्ट (१० मीटर), मिडियम (२० मीटर), आणि लांब अंतर (५० मीटर) पर्यंत आहे.
-
IP68 प्रमाणित असून पाण्याचा दाब सहन करू शकते.
-
१.४ किलो वजनाचे आणि बॅटरी ऑपरेटेड असल्यामुळे पोर्टेबल आहे.
या उपकरणाच्या सहाय्याने बुडालेली व्यक्ती कोणत्या भागात आणि किती खोलीवर आहे, याची अचूक माहिती मिळते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना शोध मोहीम अधिक सोप्या पद्धतीने आणि वेळेवर राबवता येते.
वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पाव यांनी सांगितले की, “या आधुनिक यंत्रामुळे आमच्या शोध मोहिमा अधिक प्रभावी बनणार आहेत. वेळेवर आणि अचूक माहिती मिळाल्यास बुडालेल्या व्यक्तींचे प्राण वाचवण्याची संधी वाढते.”
या उपकरणांचा वापर भविष्यातील बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे आणि वसई-विरार महानगरपालिकेचा हा निर्णय एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
What's Your Reaction?






