विक्रोळी उड्डाणपूल उद्या सायंकाळपासून वाहतुकीस खुला — औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय

मुंबई, १३ जून २०२५ (प्रतिनिधी): विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील महत्त्वपूर्ण उड्डाणपूल उद्या, शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून सर्वसामान्य वाहतुकीस खुला होणार आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोणताही औपचारिक समारंभ न घेता पुलाचे तातडीने उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बृहन्मुंबई महापालिका) नियोजित वेळेत पूल पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करताना, पावसाळ्याचे आगमन लक्षात घेऊन आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पूल त्वरित खुला करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनीही या निर्णयास मान्यता दिली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाचे बांधकाम दिनांक ३१ मे २०२५ रोजी पूर्ण झाले. विक्रोळी पश्चिमेतील लालबहादूर शास्त्री मार्ग व पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या या पुलामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांमधील जोड सुलभ होणार असून, दररोजच्या प्रवासात सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. पूल विभागाच्या समन्वयाने उभारलेल्या या पुलाची एकूण लांबी ६१५ मीटर असून त्यातील ५६५ मीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेने व ५० मीटर रेल्वे विभागाने पूर्ण केले आहे. पुलाची रुंदी १२ मीटर आहे.
या प्रकल्पात एकूण १८ तुळया वापरण्यात आल्या असून त्यांचे वजन सुमारे २१४२ टन एवढे आहे. रेल्वे विभागाच्या ७ तुळयांचे एकूण वजन ६५५ टन इतके आहे. पुलासाठी १९ स्तंभ उभारण्यात आले असून यातील १२ स्तंभ पूर्वेकडे तर ७ स्तंभ पश्चिमेकडे आहेत. दोन्ही बाजूंनी पोहोच रस्ते, कॉंक्रिटिंग, ध्वनी-आणि अपघातरोधक अडथळे, रंगकाम, मार्ग रेषा आखणी अशी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, रस्ते व वाहतूक विभागाने पुलाच्या पश्चिमेकडील टोकावर वाहतूक थांबा क्षेत्र (Bay) देखील विकसित केले आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणणाऱ्या या नव्या उड्डाणपुलामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
What's Your Reaction?






