मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण, सरकारकडे मदतीची मागणी

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही महिन्यांपूर्वी शेफच्या नोकरीसाठी मालदीवला गेला होता. परंतु सध्या त्याला तिथे गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. पारीख यांच्या मुलाने मुंबईला परतण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला परतण्यापासून रोखले जात आहे. गायत्री पारीख यांच्या मुलाबरोबर इतर १०-१५ जणदेखील तिकडे अडकले आहेत. या सर्वांनी मदतीसाठी पारीख यांच्याकडे संपर्क साधला आहे. त्यांच्या आईने मंत्रालय, स्थानिक राजकीय नेते आणि पोलिसांकडे वारंवार पत्रव्यवहार केला असून, अनेक चकरा मारल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.गायत्री पारीख यांनी सांगितले,
“माझ्या मुलाला तिथे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याला त्वरित भारतात परत आणावे अशी माझी विनंती आहे. माझ्यासोबत अन्य १०-१५ कुटुंबेही याच समस्येला सामोरी जात आहेत.” मालदीवमध्ये शेफ म्हणून काम करण्यासाठी गेलेले हे सर्व लोक सध्या अडचणीत सापडले असून, त्यांना तिथून सुटण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यांचा तातडीने सुटका करण्यात यावी, अशी विनंती पारीख यांनी सरकारकडे केली आहे. गायत्री पारीख यांच्या सर्व प्रयत्नांनंतरही, अजूनही त्यांच्या मुलाला परत आणण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. अखेरीस, त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून मदतीची याचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
“सरकारने तातडीने पाऊले उचलून माझ्या मुलाला आणि तिकडे अडकलेल्या इतर लोकांना सुटका करून द्यावी. आम्ही खूप प्रयत्न केले, पण अजूनही कोणतीही मदत मिळालेली नाही,” - गायत्री पारीख, आई.
What's Your Reaction?






