अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.) : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने, दर्यापूर - अंजनगाव विधानसभा क्षेत्रातील मु-हा देवी येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख, बूथप्रमुख व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. माऊली आश्रम कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. "जय भवानी जय शिवराय," "शिंदे साहेब .... तुम आगे बढो," "अडसुळ साहेब .... तुम आगे बढो," आणि "शिवसेना जिंदाबाद" या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

असंख्य महिलांनी आपल्या लाडक्या नेते अडसुळ साहेबांना राखी बांधून, मुख्यमंत्री साहेबांकरीता हजारो राख्या अडसुळ साहेबांच्या सुपुर्द केल्या. माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसुळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिलांना बळ देणारी ठरेल आणि ही योजना निरंतर चालू ठेवायची असेल तर समस्त भगिनींनी महायुतीला आशीर्वाद देऊन पुन्हा महाराष्ट्र विधानसभा वर भगवा फडकविण्यास सज्ज राहावे."

जिल्हा संपर्कप्रमुख गजु पाटील वाकोडे यांनी पक्षवाढीसाठी शिवसैनिकांनी कशा प्रकारे काम केले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. सहसंपर्क प्रमुख रवि गणोरकर आणि मुन्ना ईसोकार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गोपालपाटिल अरबट यांनी केले होते आणि त्यांच्या सुचनेनुसार शेकडो कार्यकर्ते मु-हा देवी येथे उपस्थित होते.

सध्या शेताच्या कामाचे दिवस असतानाही, तालुक्यात शिवसेनेच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष मोठ्या ताकदीने सामोरे जात असल्याचे यावेळी दिसून आले. जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट आणि त्यांचे अंजनगाव दर्यापूर मधील सर्व शिवसैनिक सहकारी व पदाधिकारी नव्या उमेदीनं एकदिलाने कामाला लागल्याने, येत्या निवडणुकीत शिवसेना बाजी मारेल यात कुठलीही शंका नसल्याचे चित्र दिसते आहे.

या प्रसंगी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, जिल्हा संपर्कप्रमुख गजु पाटील वाकोडे, सहसंपर्क प्रमुख रवि गणोरकर, जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट, विधान सभा संघटक वैभव भांडे, ता. संघटक अतुल सगणे, अमरावती महानगर प्रमुख संतोष बद्रे, अंजनगाव ता. प्रमुख नितिन चौखंडे, दर्यापूर ता. प्रमुख महेन्द भांडे, शहर प्रमुख मुन्ना भाऊ ईसोकार, ता. संघटक राजुभाऊ गिरी, शहर प्रमुख तुषार चौधरी, तसेच परिसरातील बहुसंख्य महिला व शिवसैनिक, शाखाप्रमुख, बूथप्रमुख, शिवदूत, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.