सर डी एम पेटीट रुग्णालयात 'क्ष' किरण तज्ञाची वानवा

वसई:वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इस्पितळांमधून गरीब मध्यमवर्गीय व सर्व सामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी म्हणून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेला वर्षभरापूर्वी सूचना केल्या होत्या. सुरुवातीच्या काळात सदरच्या इस्पितळांमधून सुविधा पुरवल्या जात होत्या. काल ओघात विविध ठिकाणी उपकरणांची व तज्ञांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा मिळण्यास नागरिकांना बाहेरच्या खाजगी व महागड्या सुविधा नाईलाजस्तव स्वीकाराव्या लागत आहेत.
पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता त्यांना याबाबतचे स्वारस्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुक्त अनिल कुमार पवार व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सदर इस्पितळांच्या सेवा सुविधांची चाचपणी करणे गरजेचे आहे.
वसई पारनाका येथील सर डी एम पेटिट रुग्णालयात एक्स-रे मशीन मागील काही महिन्यांपासून बंद होती याबाबत प्रसार माध्यमांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही दिवसांनी त्याची तरतूद करण्यात आली. याच इस्पितळात मागील सामान्य रुग्णांसाठी काही महिन्यांपासुन 'क्ष' किरणतज्ञ (रेडियोलॉजीस्ट) उपलब्ध नाही. परिणामी सर्वसामान्य रुग्णाला सोनोग्राफीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजून बाहेरील खाजगी ठिकाणी सोनोग्राफी करावी लागत आहे.
पालिकेकडे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना या तरतुदी करण्यात अधिकारी स्वारस्य का दाखवत नाहीत? हा संशोधनाचा विषय आहे. येणारे रुग्ण खाजगी सोनोग्राफी सेंटर मध्ये वळते करण्यासाठी ही तरतूद आहे का ? इथेही टक्केवारीचा खेळ सुरू आहे का? असा प्रश्न करदात्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साटे लोटे अशा खाजगी सोनोग्राफी सेंटर सोबत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे.
सर डी एम पेटिट रुग्णालयात बाळंतीणीची सोनोग्राफी सुविधा उपलब्ध आहे. परंतु, अन्य रुग्णांसाठी क्ष किरण तज्ञ उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त होत आहे याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापिका डॉ. राणी बदलाणी यांना विचारणा केली असता, ही सुविधा तूर्तास बंद असून बाहेरील खाजगी सोनोग्राफी सेंटर कडे सवलतीच्या दरात सेवा देत असल्याचे सांगितले. खाजगी सेंटर बरोबर सवलतीच्या तत्त्वावर ही सेवा सुरू आहे. 'क्ष' किरण तज्ञ उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांना पत्रे देण्यात आलेली आहेत. तरी अजूनही तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दोन दिवसांपासून या विषयावरती प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांना समस्या कळवली असता, त्यांनी त्याची दखल घेऊ असे सांगितले आहे.
What's Your Reaction?






