अदानींची सर्व कामे, जीआर निघाल्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही - आदित्य ठाकरे

अदानींची सर्व कामे, जीआर निघाल्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही - आदित्य ठाकरे

मुंबई : विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार निर्णय घ्यायला घाई करत आहे. पण मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत अदानींची सर्व कामे, जीआर निघणार नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असा दावा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर मोठ्या जल्लोषात साजरा झाला. त्यात यंदा प्रथमच युवा नेते आदित्य ठाकरे यांचे भाषण झाले. या भाषणात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच आपण प्रथमच शिवतीर्थाच्या व्यासपीठावरुन बोलत आहोत असे सांगत त्यांनी आपले आजोबा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आदित्य ठाकरे यांनी माझ्या मागे वडीलांचा, आजोबांचा आणि पणजोबांचा आशीर्वाद असल्याचे यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले की, मी दसरा मेळाव्यात पहिल्यांदा भाषण करत आहे. मनात अनेक आठवणी आहेत. लहानपणी दसरा हा मोठा दिवस होता. आज्याचं भाषण असायचं. बाळासाहेबांचं भाषण ऐकायला इथे समोर बसलो आहे. मग वडिलांचं भाषण ऐकायला बसायचो. २०१० मध्ये याच मेळाव्यात युवा सेनेची स्थापना केली. त्यांनी तलवार हातात दिली आणि लढण्याचं बळ दिलं. आदित्य लढं, मातीसाठी लढं, महाराष्ट्रासाठी लढं. मी वडिलांचा शपथविधीही पाहिला. भाषण ऐकली आहे. गेल्या १४ वर्षात मी कधी भाषण केलं नाही. आगामी निवडणूक ही सर्वात मोठी लढाई असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले, तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आमच्या सरकारच्या काळात दावोस आर्थिक परिषदेला गेलो होतो, तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावाही त्यांनी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow