घाटकोपर अपघात : भरधाव टेम्पोनं ६-७ जणांना चिरडलं; महिलेचा मृत्यू, चार गंभीर जखमी

कुर्ला येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईतील घाटकोपर परिसरात भरधाव टेम्पोनं दिलेल्या धडकेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर चार पादचारी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.

घाटकोपर अपघात : भरधाव टेम्पोनं ६-७ जणांना चिरडलं; महिलेचा मृत्यू, चार गंभीर जखमी

मुंबई - मुंबईत रस्ते अपघातात गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसते आहे. कुर्ला येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपर येथे भरघाव येणाऱ्या टेम्पोने ६-७ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगर बाजारात हा अपघात झाला असून यात या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. प्रीती पटेल (वय 35, राहणार घाटकोपर, पश्चिम) असे मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो चालकाचे वाहन चालवत असताना स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडलं आहे. उत्तम बबन खरात ( वय २५ ) असं टेम्पो चालकाचं नाव आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक उत्तम खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा अपघात कसा घडला, याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. रेश्मा शेख (23 वर्षे), मारुफा शेख (27 वर्षे), तोफा उजहर शेख (38 वर्षे), मोहरम अली अब्दुल रहीम शेख (28 वर्षे) हे चारजण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

झोनल पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.30 च्या सुमारास नारायण नगर येथून कोल्ड्रिंक घेऊन टेम्पो भरधाव वेगाने जात होता. टेम्पो चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील टेम्पोनं पादचाऱ्यांना धडक दिली. अपघातात टेम्पो चालक उत्तम बबन खरात हा जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून टेम्पो जप्त करण्यात आला आहे." प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार लोकांनी आरोपीला पकडून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow