नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार-राज्यपाल

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार-राज्यपाल

नाशिक:आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल.राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापिठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. पालकमंत्री भुसे यांनी नार - पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ, खासदार भगरे, आमदार दराडे, आमदार इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार खोसकर, आमदार पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow