पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नालासोपारा येथे भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नालासोपारा येथे भुयारी गटार योजनेचे  भूमिपूजन
विरार : आज दि.०२ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजने अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नालासोपारा येथे भुयारी गटार योजना (Underground Sewage Project) झोन-३ राबविणे व मलनिःसारण केंद्र उभारणे कामाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन रित्या करण्यात आले. 
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात सदर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर  खासदार हेमंत सवरा, आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार, माजी उप-महापौर उमेश नाईक, माजी नगरसेवक प्रफुल साने, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप-आयुक्त गणेश शेटे प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे हे उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर नागरिक, पत्रकार,  मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नालासोपारा येथे भुयारी गटार योजना (Underground Sewage Project) झोन-३ राबविणे व मलनिःसारण केंद्र उभारणे कामी मंजूर ठेकेदार मे.इगल इन्फ्रा इंडिया लि. यांना कार्यादेश देण्यात आलेला असून या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाची अंदाजपत्रकीय रक्कम  रु.४३४.११ कोटी इतकी असून  यामध्ये  केंद्र शासनाचे २५%, राज्य शासनाचे ४५% व महानगरपालिकेचे ३०% याप्रमाणे वित्तीय आकृतीबंध असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २ वर्ष कालावधी लागणार असून या मलनिःसारण केंद्राची क्षमता १०३ MLD असणार असून ६५ कि.मी. मलवाहिन्या भूमिगत अंथरण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे महानगरपालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य प्रभावीपणे राबविले जाणार  आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow