परिमंडळ १ बनले स्मार्ट; पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

परिमंडळ १ बनले स्मार्ट; पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

वसई : मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मध्ये ‘स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पना यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या सात पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे परिमंडळ १ व त्यातील ठाण्यांना (A++) मानांकन मिळाले आहे.

परिमंडळ १ मध्ये मिरा रोड येथे मुख्यालय असून, येथे तीन सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये व सात पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी नागरिकाभिमुख सेवा, शिक्षित पोलिस कर्मचारी, तसेच डिजिटल प्रणालीचा अधिकाधिक वापर यावर भर देण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) कैलास गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सर्व पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, कागदपत्र व्यवस्थापन सुलभ केले गेले आहे. आता कोणताही दस्तावेज अवघ्या एका मिनिटात उपलब्ध होतो. शिवाय बेवारस वाहने लिलाव करून काढण्यात आली असून, 'नो प्लास्टिक झोन' आणि 'ग्रीन ऑक्सिजन झोन' सारखे उपक्रमही राबवले आहेत."

सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, महिला सुरक्षा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध विषयांवर १०० हून अधिक कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांचे कौशल्यवर्धन झाले आहे.

मिरा रोड कार्यलयास (A++) मानांकन मिळाले आहे, तसेच नवघर व मिरा रोडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयांना आणि काशिमिरा, मिरा रोड, नवघर पोलीस ठाण्यांना (A++) श्रेणी प्राप्त झाली आहे.

नागरिकांशी सौजन्याने संवाद साधण्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तपासणी करताना ६८ नागरिकांशी संपर्क साधला, त्यापैकी सर्वांनी चांगला अनुभव असल्याचे सांगितले, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow