पोलिसांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा प्रमुख रेल्वे स्थानकात घातपात विरोधी मोहीम

मुंबई- जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर रेल्वे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. विविध रेल्वे स्थानकात विशेष घातपात विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षेसाठी ही मोहीम राबविण्यात आली. नुकताच जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आयुक्तांनी सर्व रेल्वे स्थानकात गस्त वाढविण्याबरोबर तपासणी मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. बुधवारी सकाळी लोकमानय टिळक रेल्वे टर्मिनस (एलटीटी) स्थानकात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. रेल्वे मुख्य प्रवेशद्वार, सभागृह, प्रतीक्षालय, वाहनतळ परिसर, पार्सल कार्यालय, फलाट आदी ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली.
मोटरमन आणि गार्ड लॉबी, स्टार बुकिंग सभागृहातही पथकाने कसून तपासणी केली. या स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्यांची देखील तपासणी करण्यात आली. संशयित प्रवाशांच्या बॅगा तपासण्यात आल्या. यावेळी रेल्वे पोलिसांनी संचलन केले. वसई रोड रेल्वे स्थानकातही विशेष घातपात विरोधी मोहीम राबविण्यात आले. मंगळवारी देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानका सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. सुरक्षा यंत्रणेचा आढावा हल्ल्याच्या पार्श्वभमूमीवर रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर प्रवेशद्वार यांची चाचपणी करण्यात आली.
पोलिसांकडे असलेली शस्त्रे आणि इतर साहित्यांचा आढावा घेण्यात आला. आपतकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हल्ल्यानंतर आम्ही सर्व पोलीस ठाण्याची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पोलीस गस्ती वाढविण्यात आल्या आहे. रेल्वे सुरक्षा बल, गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेत कुठल्याही त्रुटी राहू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रवाशांनी देखील कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशसानला सहकार्य करावे असे आवाहन सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय तायडे यांनी केले आहे.
What's Your Reaction?






