वसई : फिलीपाईन्सच्या सेबू शहरात भीषण रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वसईतील परेरा दांपत्याचे मृतदेह तब्बल दहा दिवसांनंतर मायदेशी आणण्यात आले. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता वसई पश्चिमेतील सेंट थॉमस चर्चमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर ख्रिस्ती धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

जेरॉल्ड आणि प्रिया परेरा हे दांपत्य वसई पश्चिमेच्या सांडोर गावात राहत होते. मे महिन्याच्या सुटीमध्ये त्यांनी फिलीपाईन्समधील सेबू येथे सहलीसाठी जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, १० मे रोजी त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमी अवस्थेत जेरॉल्ड यांनी वसईच्या माणिकपूर चर्चमधील धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे अपघाताचे वृत्त त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सांडोर गावावर शोककळा पसरली आहे.

दांपत्याच्या पश्चात मुलगा तनिष (२०) आणि मुलगी त्रिशा (१७) असा परिवार आहे. मृतदेह मायदेशी आणण्यासाठी परेरा यांचे नातेवाईक फिलीपाईन्सला गेले होते. विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अखेर दोघांचेही पार्थिव भारतात आणण्यात आले.

सेंट थॉमस चर्चमध्ये झालेल्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, स्थानिक ग्रामस्थ आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. फादर रेमंड यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, "प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असले तरी सर्व प्रक्रिया पार पाडून मृतदेह मायदेशी आणण्यात यश मिळाले. हे अत्यंत दुःखदायक असून संपूर्ण गाव त्यांच्या दुःखात सहभागी आहे."