रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाला गती; एमएमआरडीएला ₹१५०० कोटींचा कर्जपुरवठा एमएमआरडीएच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिलाच झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प

मुंबई, २० मे: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या ५० वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच थेट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला हात घातला असून, घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकासासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१५०० कोटींचा कर्जपुरवठा मंजूर झाला आहे. एकूण ₹८४९८ कोटींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी हा पहिला आर्थिक टप्पा असून, यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मोठा वेग मिळणार आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा समावेशक आणि शाश्वत नागरी विकासाचा प्रकल्प आकार घेत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सन्माननीय व सुरक्षित घरे, भक्कम पायाभूत सुविधा आणि उज्वल भविष्यासाठीची संधी निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे.
एकूण प्रकल्पासाठी ₹३९१६ कोटींचे कर्ज उभारण्यात येणार असून, त्यातील ₹१५०० कोटी बँक ऑफ महाराष्ट्रने मंजूर केले आहेत. या आर्थिक करारामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला गती मिळणार आहे, तसेच एमएमआरडीएच्या आर्थिक नियोजनावरही विश्वास दृढ झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा प्रकल्प केवळ घरे बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर तो समुदायांना स्थैर्य व विकासाची संधी देणारा आहे. शासन एक न्याय्य, समावेशक आणि भविष्योन्मुख मुंबई उभारण्यासाठी कटिबद्ध आहे.” उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “₹१५०० कोटींची कर्जमंजुरी म्हणजे शासन व एमएमआरडीएच्या एकत्रित दृष्टिकोनाचा विश्वासार्ह पुरावा आहे. रमाबाई नगरमधील हजारो कुटुंबांच्या जीवनात या प्रकल्पामुळे सकारात्मक परिवर्तन घडेल.” महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे स्वयंनिर्भर नागरी पुनरुत्थानाचा आराखडा आहे. ४६% निधी संस्थात्मक कर्जातून तर ३९% अंतर्गत महसुलातून उभारला जात आहे, जे एमएमआरडीएच्या आर्थिक शिस्तीचे प्रतीक आहे.” या ऐतिहासिक टप्प्यामुळे रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाला बळ मिळाले असून, तो महानगर प्रदेशातील इतर पुनर्विकास योजनांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
What's Your Reaction?






