भाईंदर येथे २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन

भाईंदर:आमदार प्रताप सरनाईक यांनी दि. २८ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग ‘सनातन राष्ट्रसंमेलना’चे आयोजन केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, भाईंदर येथे दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत हा सत्संग संपन्न होईल. मिरा-भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदर मध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
या भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज उपस्थित राहणार आहेत. तीनही दिवस त्यांचे प्रवचन होईल. तर तिसऱ्या दिवशी प. पू. बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य 'विद्याभास्कर' जी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमाम्नाय द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज कोषाध्यक्ष - राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास (अयोध्या), गजानन ज्योतकर गुरूजी अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचेही या संमलेनात प्रवचन होणार आहे. मिरा-भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच दि. ३० सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल. या यात्रेत ५१०० महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल.
या भागवत सत्संगासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात ४० ते ५० हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १०० महिला व १०० पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक व टीम करीत आहे.
What's Your Reaction?






