वेबसाईटच्या माध्यमातून मोठी फसवणूक: बनावट इस्टेट एजंटांचा नवा स्कॅम उजेडात

भाईंदर:काशिगांव पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे, ज्यात बनावट इस्टेट एजंट आणि तोतया रूम मालकांनी मिळून फिर्यादीची ९.५० लाख रुपयांची फसवणूक केली होती. “नो ब्रोकर” या वेबसाईटवरून फिर्यादीने मिरा रोड येथे हेवी डिपॉझिटवर फ्लॅट घेण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, त्या फ्लॅटचा खोटा मालक आणि बनावट एजंटांच्या साक्षात्कारातून त्याची फसवणूक झाली.
फिर्यादीने काशिगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल तांत्रिक विश्लेषणातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहरुख नियाज अहमद, आफताफ मोहनुजमा आलम, आणि रमेश गिसीअवन शर्मा अशी आहेत. अटक आरोपी शाहरुख अहमद आणि आफताफ आलम यांच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत.
सदर प्रकरणात फिर्यादीची ९.५० लाख रुपये फसवणूक झाली होती, ती रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. यातील आरोपींनी बनावट दस्तावेज तयार करून रूम मालक आणि इस्टेट एजंट असल्याचे भासवून फिर्यादीची फसवणूक केली होती.
पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे की, फ्लॅट भाड्याने घेण्यापूर्वी किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याआधी इस्टेट एजंट आणि मालकांची संपूर्ण तपासणी करूनच व्यवहार करावा.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
What's Your Reaction?






