मीरा-भाईंदर शहर होतंय 'उडता पंजाब' - नशा आणि हिंसाचाराच्या प्रकरणात वाढ

मीरा-भाईंदर शहर होतंय 'उडता पंजाब' - नशा आणि हिंसाचाराच्या प्रकरणात वाढ

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर शहर जे एक काळी शांत परिसर म्हणून ओळखलं जात होतं ते आता अमली पदार्थांची तस्करी आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे 'उडता पंजाब' होण्याच्या मार्गावर आहे. शहरात विविध भागात नशेत धुंद असलेल्या तरुणांचे घोळके रस्त्यावर हिंसा करताना दिसत आहेत ज्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच घडलेल्या घटनेत मीरा रोडवरील बेव्हर्ली पार्क परिसरात असणाऱ्या गौरव वुड्स फेस २ येथील लूडो लाँजच्या बाहेर नशेत असणारे तरुणांचे दोन ग्रुप एकमेकांशी भिडले होते. तसेच मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरातील ललन तिवारी कॉलेज जवळही दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. यामुळे पोलिसांसोबतच स्थानिक प्रशासनाचे ही या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

पान शॉप्स, बियर शॉप्स आणि चायनीज फूड स्टॉल्सवर अमली पदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहे. यावर पोलिस प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे अमली पदार्थांच्या धंद्यात असलेले लोकं खुलेआम आपलं काम सुरु ठेवत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा या संदर्भात पोलिसांना तक्रारी केल्या असल्या तरीही, पोलिसांकडून याविषयी ठोस कारवाई केली जात नाही तसेच पोलिसांकडून मिळणार प्रतिसाद निराशाजनक आहे. स्थानिक लोकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी आवाज उठवला आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असून लवकरात लवकर यावर कारवाई नाही केली तर यांसारख्या वाढत्या घटनांची संख्या लक्षात घेता, मीरा भाईंदर शहर 'उडता पंजाब' स्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow