भाईंदरमध्ये ऑनलाईन ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक; सायबर शाखेने परत मिळवून दिले १४ लाख रुपये

मीरा भाईंदर - दिवसेंदिवस सायबर गुन्हे प्रकरणात वाढ झाली असून फेसबुक, टेलिग्राम आदींवर शेअर ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हे शाखेने तीन प्रकरणात फसवणुक झालेले १४ लाख रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले आहे.
ऑनलाईन शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळविण्यात अनेकांचा कल वाढला आहे. त्याचा फायदा घेत सायबर भामटे सक्रीय झाले आहेत. ते फेसबुक, टेलिग्राम, व्हॉटसअप आदी माध्यमातून नागरिकांना संपर्क साधून त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक करतात. अशाच भूलथापांना बळी पडून मिरा रोड मध्ये राहणारे सुंदर यांनी फेसबुक वरील शेअर ट्रेडिंग ग्रुपवर ३ लाख ४९ हजार रुपयांची गुंतवूणूक केली होती. भाईंदर येथील तक्रारदार शहा यांनी एसएमसी ग्लोबल या ॲपवर १० लाखांची गुंतवणूक केली होती. तर भाईंदर मध्येच राहणार्या तक्रारदार धनावडे यांनी टेलिग्राम वरील ४ लाख ८९ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र त्यांची सायबर भामट्यांनी फसवणूक केली होती. याबाबत तक्रारदारांनी सायबर हेल्पलाईनवर (एनसीसीआरपी) वर वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तिन्ही प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. ज्या खात्यात पैसे वर्ग झाले आहेत त्या बॅंकेशी संपर्क करून पैसे गोठविण्यात आले. त्यानंतर न्यायालयात अर्ज करून तक्रारदारांना पैसे परत करण्यात आले.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयु्क्त मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील व्हावळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
आपल्यासोबत सायबर गुन्हा होऊ नये म्हणून ही खबरदारी घ्या -
शेअर बाजार, फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सी, म्युच्युअल फंड आदींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराबरोबच चर्चा करावी.
फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमावर जास्त परतावा देणार्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये.
सायबर भामटे विश्वास संपादन कऱण्यासाठी अन्य लाभार्थ्यांचे बनावट स्क्रीन शॉटस, सेबीची बनावट प्रमाणपत्र सादर करत असतात. त्यापासून सावध रहावे
फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर अथवा शासनाच्या सायबर संकेतस्थळावर संपर्क साधावा.
What's Your Reaction?






