मंत्री देवेंद्र फडणवीस वसई दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, जोरदार स्वागताची तयारी
वसईत भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह; पावसातही स्वागतासाठी तयारी जोमात

वसई, १६ जून: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वसई दौऱ्यावर येत असून त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. वसई-विरार परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन, शासकीय योजनांचा शुभारंभ आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी त्यांची ही भेट ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा पागोरा पाठोपाठ आज सोमवारी वसईत होणार आहे. वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या माणिकपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दुपारी २.१० वाजता होणार असून यावेळी वनमंत्री तथा पालकमंत्री गणे नाईक, आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, खासदार डॉ. हेमंत सवरा, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजन नाईक, हरीचंद्र भोये तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत, वाढवण बंदरावरील चर्चा, वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटिट विस्तारित रुग्णालयाचे उद्घाटन, बोळींजळीं पोलीस ठाण्याचे एसीपी व डीसीपी कार्यालयाचे ऑनलाईन उद्घाटन आणि बांबू लागवड उपक्रमांचा शुभारंभ अशा विविध योजनांचा समावेश या दौऱ्यात आहे.
फडणवीस यांच्या स्वागतासाठी रविवारी सायंकाळपासूनच विविध मार्गांवर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत फलक लावण्यात आले असून काही ठिकाणी झेंड्यांनी रस्ते सजवले आहेत. काही भागांमध्ये पावसातही खड्डे बुजवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
महापालिका, पोलीस व महसूल विभागांकडून सुरक्षेची व वाहतूक सुरळीत ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






