मिरारोड, १४ जून २०२५: मिरारोडमधील कनकिया परिसरातील म्हाडा वसाहतीत एक धक्कादायक आणि अमानुष हत्या उघडकीस आली आहे. करिश्मा (पूर्ण नाव गोपनीय) या २४ वर्षीय महिलेची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, ही हत्या तिच्याच प्रियकराने, वैयक्तिक वादातून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाचा फक्त चार तासांत छडा लावत, मिरारोड पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे आणि त्यांच्या पथकाने शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ (वय २४, व्यवसाय – शेफ) या आरोपीला अटक केली.

प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले की, करिश्मा व शमशुद्दीन यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. वाद विकोपाला गेल्यावर, रागाच्या भरात आरोपीने करिश्माच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिचा जागीच खून केला.

करिश्माचा मृतदेह म्हाडा वसाहतीतील तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास केला असून, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

या अत्यंत निर्घृण आणि क्रूर हत्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.